शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

Thursday 26 October 2017

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा...!!!
  कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या ओळी अनेकांना जगण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या. अनेक मोडून पडलेल्या मनांना पुन्हा नव्याने उभारण्यास प्रेरणा देणाऱ्या. हे शब्द जेंव्हा आपल्या बाबतीत खरे ठरतात तेंव्हा मनाला मिळणारी उभारी शब्दांत व्यक्त करता येत नाही.
      जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारगाव जोगेश्वरी ता-आष्टी ही आमची प्रयोगशील शाळा. रेकॉर्डिंग स्टुडीओ ही नवीन संकल्पना आम्ही तेथे सुरु केली. संगीत विषयाच्या सहाय्याने इतर विषयांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्यासाठी काय करता येईल? अभ्यास न आवडणाऱ्या मुलांसाठी काय करता येईल? याबाबतचे काही प्रयोग आम्ही तेथे करत होतो. त्यासाठी लोकसहभागातून आम्ही एक अद्यावत रेकॉर्डिंग स्टुडीओ व म्युझिक स्टुडीओ उभा केला होता. सगळे काही व्यवस्थित सुरु होते मुले संगीताचा आनंद लुटत नवनवीन बाबी शिकत होती. त्याबाबतचे प्रयोग आम्ही शेअर करत होतो. परंतु अचानक एखाद स्वप्न मोडाव तस झाल आणि आमच्या शाळेत चोरट्यांनी चोरी करून आमच्या रेकॉर्डिंग स्टुडीओ मधील बरेचसे साहित्य चोरून नेले. त्यांनी फक्त साहित्याच नव्हे तर आमचा उत्साह, उमेद आणि आमच्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद सुद्धा चोरून नेला. त्यांना फक्त एकच गोष्ट चोरता आली नाही ती म्हणजे आमची जिद्द’.
              या घटनेने मन सुन्न झाले आणि एका स्वप्नाचा गर्भपातया नावाने मी एक पोस्ट सोशल मिडियावर लिहिली. खरे तर मनातील सल बाहेर काढण्याचा हा एक प्रयत्न होता. परंतु आमच्या या प्रयोगावर प्रेम करणाऱ्या राज्यभरातील अनेक मान्यवर अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक, प्रयोगशील शिक्षक आणि मित्र मंडळींनी या वेळी आमची उमेद कमी होऊ नये म्हणून धीर दिला. खचून जाऊ नकोस हा स्टुडीओ पुन्हा उभा राहिल असा ठाम विश्वास सर्वांनी दिला. अशा वेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सक्षमपणे आमच्या मदतीला धावून आले. आदरणीय सुप्रिया ताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच या प्रतिष्ठानचे सदस्य आणि शिक्षण विकास मंचचे संयोजक माजी शिक्षण संचालक मा.वसंत काळपांडे साहेब यांनी सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त विधायक काम म्हणून पारगाव जोगेश्वरी शाळेतील स्टुडीओ पुन्हा उभा करूयात ही संकल्पना मांडली. मा.दत्ता बाळसराफ सर, मा.निलेश राउत सर, बसंती रॉय मदम यांनी ही संकल्पना तात्काळ तडीस नेत ५१००० रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले. स्वतः निलेश राउत सरांनी मला फोनवर ही वार्ता सांगितल्यानंतर माझाच मला विश्वास बसेना, कारण खूप कष्टातून हा स्टुडीओ उभा राहिला होता. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि शिक्षण विकास मंचच्या मदतीने आमचे अर्ध्यावर तुटलेले स्वप्न पुन्हा उभे राहणार होते. आज दुपारीच मोबाईलवर मेसेज आला.
 स्वतः शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे साहेबांनी या चोरीची दखल घेतली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि शिक्षण विकास मंचच्या मदतीने ५१हजार ऐवजी ६२५०० रुपये आमच्या स्टुडीओच्या उभारणीसाठी मिळाले होते.

           आमच्या स्टुडीओचे स्वप्न पुन्हा उभे राहणार आहे. पारगावच्या शाळेत पुन्हा वाद्यांचे सूर घुमणार आहेत. किलबिल पाखरांचा मंजुळ आवाज पुन्हा कानात रुंजी घालणार आहे. गेले काही दिवस हिरमुसल्या चेहऱ्यांवरचे हास्य पुन्हा परत येणार आहे आणि हे घडतंय केवळ आणि केवळ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि शिक्षण विकास मंचच्या मदतीने. या प्रतिष्ठान च्या वतीने आमच्या स्टुडीओसाठी मदत करणारे डॉ.वसंत काळपांडे साहेब, मा.दत्ता बाळसराफ सर, मा.निलेश राउत सर, मा.बसंती रॉय, मा.उषाताई राणे  मा.दिनकर टेमकर साहेब, मा.बाळासाहेब कानडे, मा.अनिल शिनगारे, मा.सोनाली, मा. चेतन सर, मा.माधव सूर्यवंशी सर, मा.राजीव तांबे सर, मा. वैशाली सरवणकर मदम, मा.मृणाल पाटोळे मदम , मा.सुहास तेंडूलकर सर,मा. आशिष दामले सर, मा.गजानन उदार सर, मा.प्राची साठे मदम, मा. उषा राणे मदम मा.मिलिंद चिंदरकर सर, या आणि सर्वांचे आमचा स्टुडीओ उभा करण्यास भक्कम मदत केल्याबद्दल आमच्या शाळेच्या वतीने जाहीर आभार

एका स्वप्नाचा गर्भपात ...!!!

एका स्वप्नाचा गर्भपात ...!!!
एखाद स्वप्न दीर्घकाळ पहावं, ते सत्यात उतरविण्यासाठी प्रचंड कष्ट उपसावेत, मृगजळासारखे त्या स्वप्नाने अनेकदा आपल्याला हुलकावणी द्यावी, प्रचंड उरफोडीनंतर ते स्वप्न हातात यावं अन सुळकन हातातून मासा निसटून जावा तसं ते हातात आलेलं स्वप्न चूर चूर व्हावं.... या वेदनांना काय म्हणाल ...?? एका स्वप्नाचा गर्भपात... मला सुचलेलं अगदी समर्पक शीर्षक.
                समाजातील गरीब, मागास, कष्टकरी समाजातील मुलांना शाळेची गोडी लागावी, ती मुले शिकती व्हावीत,आणि आईवडिलांच्या वाट्याला आलेल्या दु:ख, दैन्य किमान त्यांच्या वाट्याला येऊ नये म्हणून वाट्टेल ते करायचे पण मुलांना शिकवायचे हा बाणा घेऊन शिक्षकी पेशा स्वीकारलेला मी. मुलांसाठी वेगवेगळे प्रयोग करीत प्रत्येक मुल शिकले पाहिजे आणि शाळेत टिकले पाहिजे यासाठी मुलांना आवडणाऱ्या बाबी शाळेतील शिक्षकांच्या आणि समाजाच्या सहकार्याने उभ्या करत एक समृद्ध शाळा उभारत गेलो. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारगाव जोगेश्वरी ही आमची एक नाविन्यपूर्ण आणि उपक्रमशील शाळा. शाळेतील औपचारिक शिक्षणाची भीती वाटणाऱ्या मुलांसाठी शाळेत काहीतरी नवीन करावे हा विचार मनात होता. मुलांशी बोलताना लक्षात यायचे की मुलांना गाणी म्हणायला आवडते, नाचायला आवडते, वाद्ये वाजवायला आवडतात, अभिनय करायला आवडतो. आणि शाळेतील पारंपारिक विषयांच्या अभ्यासात मागे असलेली मुले या गुणांत मात्र सरस होती. असे काहीतरी करायचे की ज्यायोगे मुलांना शाळेची गोडी लागेल , मुलांचा आत्मविश्वास वाढेल, आणि त्या गोष्टीचा मुलांच्या शिकण्यासाठी आणि जगण्यासाठी सुद्धा उपयोग होईल.
            रेकॉर्डिंग स्टूडीओ , म्युझिक स्टूडीओ आणि कारओके स्टूडीओ या संकल्पनांवर काम करायला सुरुवात केली. शाळेतील शिक्षकांची भक्कम साथ आणि ग्रामस्थांची सोबत यातून दुष्काळी गाव असताना सुद्धा लोकांनी पोटाला चिमटा घेऊन शिक्षकांना साथ द्यायची म्हणून लोकवर्गणी द्यायला सुरुवात केली. फक्त गावातीलच नव्हे तर गावातून स्थलांतर होऊन इतर ठिकाणी असलेल्या लोकांनी शाळेला मदत करायला सुरुवात केली. फेसबुकवरील काही मित्रमैत्रीणीनी सुद्धा या कामात आम्हाला मदत केली आणि उभा राहिला आमचा स्टूडीओ. रानातली रानपाखर गोड गळ्याने गायला लागली. स्वत:चे गाणे म्युझिक सिस्टीम वर ऐकायला लागली. आपल्या पोराचा आवाज ऐकून मायामाउल्या आणि शेतात काम करणारी मजुरी करणारी मंडळी हा माझ्याच पोराचा/पोरीचा आवाज आहे काय? याची खात्री करून घ्यायला लागली. हातात काटक्या घेऊन दिसेल त्या वस्तूवर मारून नाद निर्माण करणारी चिमुकली बोटे कॅसिओ वर फिरायला लागली त्यातून निर्माण होणार्या ध्वनित गुंग व्हायला लागली. ढोल,ढोलकी, ड्रम, खंजिरी, यातून ठेका निर्माण करायला लागली. लाईट, कॅमेरा , अक्शन हे शब्द ऐकताच कॅमेर्यासमोर उभे राहून पुस्तकातील पाठाचे नाट्यीकरण करायला लागली, त्यांचे रेकॉर्ड केलेले पाठ प्रोजेक्टरवर पाहत माझा कोणत्या शब्दाचा उच्चार चुकला ते स्वत:हून शोधायला लागली. “शिकायचं म्हणजे लय मज्जा असती” ही याच चिमुकल्यांनी केलेली आमच्या शाळेतील शिक्षणाची व्याख्या. आमच्या शाळेच्या या प्रयोगाची चर्चा राज्यभर मिडिया, सोशल मिडिया किंवा इतर माध्यमांच्या सहाय्याने पोचली. शिक्षणाच्या वारी सारख्या कार्यक्रमात आमच्या या प्रयोगाचे राज्यभरातील शिक्षकांसमोर सादरीकरण झाले. अगदी Transform महाराष्ट्र या कार्यक्रमात सुद्धा शाळेचा हा प्रयोग मांडला गेला होता. सगळ मुलांच्या शिकण्यातील बदल आताशी कुठे जाणवू लागले होते. मागील महिन्यात शिक्षण विकास मंच या राज्यातील उपक्रमशील शिक्षक, अधिकारी आणि शिक्षणशास्त्राचे अभ्यासक असणाऱ्या गटात कलेसारख्या विषयांत जिल्हा परिषदेतील शाळांतील शिक्षक काय करतात अशी चर्चा रंगली होती.त्यावेळी मी माझ्या शाळेत आम्ही करीत असलेल्या प्रयोगांची माहिती दिली होती. त्याबद्दलची पोस्त वाचून मुंबईतील निवृत्त मुख्याध्यापिका आणि समुपदेशक असलेल्या श्रीमती शैलजा मुळ्ये यांनी मला फोन केला सुमारे पंधरा मिनिटे माझ्याशी चर्चा केली. गरीब, मागास आणि कष्टकरी समाजातील  मुले इतक्या उत्तम रीतीने शिकत आहेत त्यांच्यासाठी एका जिल्हा परिषद शाळेत इतक्या काही सुविधा आम्ही उभारल्या आहेत हे ऐकून त्यांना खूप नवल वाटले. आणि त्यांनी थेट तुम्हाला सध्या काय आवश्यक आहे असे विचारले. मुलांना संगीत शिकण्यासाठी ऑक्टापड घ्यायचे हे माझे सहा वर्षापासुनचे स्वप्न होते. मी त्यांना ते बोलून दाखवले. त्यांनी क्षणाचीही उसंत न लावता मी यासाठी मदत करेल असे सांगितले. तुम्ही मुंबईला कधी येताय ? असे विचारले योगायोगाने तीनच दिवसानंतर ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमासाठी आमच्या शाळेला बोलावणे आले होते. मी एका विद्यार्थ्यासोबत मुंबईला जाणार होतो. माझ्या घरी आवर्जून या असा आग्रह श्रीमती शैलजा मुळ्ये यांनी केला आणि तीस हजार रुपये आमचे हे स्वप्न साकार करण्यासाठी दिले. प्रचंड आनंदात आम्ही शाळा उघडायची वाट पाहू लागलो कारण आमचे सहा वर्षांपासूनचे स्वप्न साकार होणार होते. शाळा सुरु झाली आणि ऑक्टापड पाहून मुले प्रचंड आनंदित झाली. उमेश, कृष्णा, लखन, अपेक्षा, वैष्णवी अशा आमच्या एकेक चिमुकल्यांचे हात त्यावर सराईतपणे चालू लागले. शाळेत न येणारी मुले या स्टूडीओच्या ओढीने शाळेत यायला लागली. लखन हा सहावीतील मातंग समाजातील मुलगा, वडिलांसोबत डफड वाजवायला जाणारा त्याच्या हातात मी स्टिक्स दिल्या आणि त्याने ऑक्टापड मधून काढलेल्या पहिल्या बोलातच त्याच्यातील प्रतिभेची जाणीव मला झाली. आठ दिवसांत लखन इतके सुंदर वाजवायला शिकला की तो वाजवताना मी त्याच्याकडे पाहतच बसायचो. या लेकराला कोणाची नजर लागू नये अशी काळजी मला वाटायची. आम्ही आता आणखी मोठी स्वप्ने पहायला लागलो. शालेय स्पर्धांत भाग घ्यायचा आणि मग काय बक्षीस आपलेच........!!!
                स्वप्न फक्त स्वप्नच राहिलं तर ते तुटण्याचं फारसं दु:ख वाटत नाही, परंतु आमचं स्वप्न आता सत्यात उतरायला लागलं होतं. अभासाकडून वास्तवाकडे त्याचा प्रवास सुरु झाला होता, आमचे ध्येय समोर दिसत होते. परंतु अचानक एखादी काच निखळून पडावी आणि त्याच्या काचा छिन्नविछिन्न होऊन भंग पावाव्यात तसे आमच्या स्वप्नाच्या चिंध्या झाल्या.
             सकाळीच एका पालकाचा फोन आला, “हल्लो सर, लवकर या आपल्या शाळेत चोरी झालीय. दरवाजा तोडलाय आपल्या म्युझिक स्टुडीओतील बरचसं सामान नेलंय ”  हे वाक्य कानात तप्त शीस ओतावं असं वाटलं. मी माझा विश्वासच बसेना. तिकडून फोनवर कृष्णा रडवेला होऊन बोलत होता. “सर, प्लीज लवकर शाळेत या”. धावतपळत शाळेत गेलो समोरील दृश्य सुन्न करणार होत. संगणक कक्षाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी म्युझिक रूम मधील बरेच समान लांबविले होते. आताच आलेला ऑक्टापड सुद्धा गेलेला. आमचा स्टुडीओ संपूर्ण उध्वस्त झालेला आणि त्याबरोबर उध्वस्त झालेलं माझं स्वप्न.......
                  या स्टुडीओमधील एकेक वस्तू जमवताना घेतलेले परिश्रम, प्रत्येक वस्तु मिळविण्यासाठी केलेली खटाटोप आणि शेवटी या वस्तू लोकसहभागातून मिळविल्यानंतर मुलांच्या शिकण्यातील आनंद. शाळेत येण्यास टाळाटाळ करणारी मुले आता शाळेत सर्वात अगोदर यायला लागली होती, नवनवीन गोष्टी शिकायला लागली होती आणि त्यातच चोरट्यांनी त्यांच्या पोटासाठी आमचे सर्वस्व लुटून नेले होते. खिन्न मनाने डोळ्यात पाणी आणून मुले बसली होती. आमच्या कडे पाहून त्यांना आम्हाला काय विचारावे हे सुद्धा समजत नव्हते. काही मुले प्रचंड चीड व्यक्त करत चोरट्यांचे वाटोळे होईल अशा शिव्याशाप देत होते. जो स्टुडीओ आमच्या शाळेची ओळख बनला होता तो आता राहिला नाही ही कल्पनाच करवत नाही. हा स्टुडीओ आता कसा उभा करावा या प्रश्नासोबत लखन दररोज विचारतोय “सर आता कुठून आणायचा स्टुडीओ? आता कोण करणार आपल्याला मदत ?” उमेश दररोज विचारतोय “ सर सापडले का चोर?” वैभवी विचारतेय “आता गाणी कशी रेकॉर्ड करायची?” आणि त्यांच्या प्रश्नांना “करू रे बाळांनो पुन्हा सगळ उभं” असं उत्तर देत मी वास्तवापासून पळ काढतोय. “कधी करणार हे उभं ?” या प्रश्नाला मात्र माझ्याकडे उत्तर नाहीये.
          गर्भात जोमाने वाढत असलेलं स्वप्न खुडून गेलं  अन या स्वप्नाचा गर्भपात झाला एवढंच वास्तव आता उरलंय. पाहूयात मोडलेलं स्वप्न पुन्हा उभं करता येतंय का?
                   
                                          सोमनाथ वाळके
                                     ७५८८५३५७७७
                 जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारगाव जोगेश्वरी
                                  ता- आष्टी, जि-बीड

                      somnathwalke007@gmail.com

Wednesday 15 March 2017

सर मी जात खोडली

"सर मी जात खोडली"

© सोमनाथ वाळके

नवीन वर्षाच्या पहिल्याच शाळेच्या कार्यदिनी वर्गात पाऊल ठेवले, मुलांनी गर्दी करून नववर्षाच्या शुभेच्छा, ग्रीटिंग कार्ड्स दिले. शुभेच्छांच्या या देवघेवीनंतर विद्यार्थी हजेरी हातात घेतली, हजेरी घ्यायला सुरुवात केली. हजेरी क्रमांक 13 पाहताना अचानक लक्ष गेले तर हजेरीचे दोन रकाने निळ्या शाईपेनने खोडलेले. काही लक्षात येईना कोणी केला असावा हा वाह्यातपणा ? थोडेसे मोठ्या आवाजात विचारले ,
"हजेरी कोणी घेतली होती रे?"
"सर,रोहनने"
मी पाहिले रोहन कावराबावरा होऊन आणि थोडासा घाबरलेल्या अवस्थेत माझ्याकडे पाहत होता.
"रोहन, तू हजेरी घेतली होतीस ?" मी विचारले.
"होय सर." रोहन खालच्या आवाजात म्हणाला.
"तुझ्या नावापुढे स्केचपेनने कोणी खाडाखोड केलीय?" मी मोठ्या आवाजात विचारले.
"मीच केली आहे सर." शांत परंतु खंबीर आवाजात रोहनने उत्तर दिले. बहुधा होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याची त्याची तयारी असावी.
आता मात्र मला कुतूहल वाटले रोहनने असे का केले असावे ?
"पण तू हे का केलेस बाळ ?" मी शांत आणि कुतुहलमिश्रित स्वरात विचारले.
"सर तुम्हीच नेहमी सांगता की पृथ्वीवर फक्त एकच जात आणि धर्म आहे तो म्हणजे माणूस, प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्याशी एक माणूस म्हणून वागले पाहिजे. प्रत्येकाने स्वतःची किंवा इतरांची जात किंवा धर्म न पाहता काम केले पाहिजे.जगात समानता आणली पाहिजे, स्वतःच्या मनातून जात काढून टाकली पाहिजे ,आणि मग आमची जात आणि धर्म हजेरीवर का लिहिलेले असते ? नीट पहा सर, मी माझा धर्म आणि जात खोडली आहे." रोहन सांगत होता मी ऐकत होतो ,वर्ग आता सर काय म्हणतील याची उत्सुकता ताणून होता.
"रोहन, आय अँम प्राऊड ऑफ यु"
माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणि डोळ्यात अश्रू तरळले,अनेक दिवसांपासून जे पेरत आहे ते उगवायला लागले आहे याचे समाधान मनाला प्रचंड आनंद देऊन गेले.
"रोहन तुझ्या या कृतीने मला झालेला आनंद मी शब्दांत सांगू शकत नाही, खरंच तुझ्या कृतीतून तू सर्वांना एक वस्तुपाठ घालून दिला आहेस. तुझा शिक्षक असल्याचा मला प्रचंड अभिमान वाटतो" मी भावनिक होऊन बोलत होतो. वर्गात मुलांशी संवाद साधताना पाठयपुस्तकांच्या पलीकडे जाऊन घटनात्मक मूल्यांच्या बाबतीत आमच्या नेहमी वर्गात गप्पा होतात. समानता, धर्मनिरपेक्षता, मानवता, स्वातंत्र्य अशा अनेक मूल्यांची रुजवणूक या गप्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांत होत असते. एक वेगळा दृष्टिकोन मुलांत आता रुजू लागलाय. सध्याच्या प्रचंड कलुषित झालेल्या वातावरणात आज घडलेल्या या सुखद प्रसंगाने मनात एक आशेची पालवी रुजविली आणि एक शिक्षक म्हणून मी योग्य मार्गाने जात आहे याची जाणीव निर्माण करून दिली.
रोहनने आज फक्त हजेरीवरूनच नव्हे तर आपल्या मनातून जात खोडून टाकलीये याचे मनाला असणारे समाधान वेगळेच आहे. 2017 सालच्या वर्गातील पहिल्याच दिवशी घडलेला हा प्रसंग आयुष्याच्या पटलावर कोरून राहणार हे नक्की.
    चला अशा अनेक रोहनच्या जाती आणि धर्म त्यांच्या मनातून पुसून टाकण्यासाठी पाऊल टाकुयात. समतेच्या जगासाठी प्रयत्न करूयात.

    ©सोमनाथ वाळके ©
जि.प.कें.प्रा.शाळा पारगाव जोगेश्वरी
        ता-आष्टी, जि-बीड
     📱7588535777
somnathwalke007@gmail.com