शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

Thursday 26 October 2017

एका स्वप्नाचा गर्भपात ...!!!

एका स्वप्नाचा गर्भपात ...!!!
एखाद स्वप्न दीर्घकाळ पहावं, ते सत्यात उतरविण्यासाठी प्रचंड कष्ट उपसावेत, मृगजळासारखे त्या स्वप्नाने अनेकदा आपल्याला हुलकावणी द्यावी, प्रचंड उरफोडीनंतर ते स्वप्न हातात यावं अन सुळकन हातातून मासा निसटून जावा तसं ते हातात आलेलं स्वप्न चूर चूर व्हावं.... या वेदनांना काय म्हणाल ...?? एका स्वप्नाचा गर्भपात... मला सुचलेलं अगदी समर्पक शीर्षक.
                समाजातील गरीब, मागास, कष्टकरी समाजातील मुलांना शाळेची गोडी लागावी, ती मुले शिकती व्हावीत,आणि आईवडिलांच्या वाट्याला आलेल्या दु:ख, दैन्य किमान त्यांच्या वाट्याला येऊ नये म्हणून वाट्टेल ते करायचे पण मुलांना शिकवायचे हा बाणा घेऊन शिक्षकी पेशा स्वीकारलेला मी. मुलांसाठी वेगवेगळे प्रयोग करीत प्रत्येक मुल शिकले पाहिजे आणि शाळेत टिकले पाहिजे यासाठी मुलांना आवडणाऱ्या बाबी शाळेतील शिक्षकांच्या आणि समाजाच्या सहकार्याने उभ्या करत एक समृद्ध शाळा उभारत गेलो. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारगाव जोगेश्वरी ही आमची एक नाविन्यपूर्ण आणि उपक्रमशील शाळा. शाळेतील औपचारिक शिक्षणाची भीती वाटणाऱ्या मुलांसाठी शाळेत काहीतरी नवीन करावे हा विचार मनात होता. मुलांशी बोलताना लक्षात यायचे की मुलांना गाणी म्हणायला आवडते, नाचायला आवडते, वाद्ये वाजवायला आवडतात, अभिनय करायला आवडतो. आणि शाळेतील पारंपारिक विषयांच्या अभ्यासात मागे असलेली मुले या गुणांत मात्र सरस होती. असे काहीतरी करायचे की ज्यायोगे मुलांना शाळेची गोडी लागेल , मुलांचा आत्मविश्वास वाढेल, आणि त्या गोष्टीचा मुलांच्या शिकण्यासाठी आणि जगण्यासाठी सुद्धा उपयोग होईल.
            रेकॉर्डिंग स्टूडीओ , म्युझिक स्टूडीओ आणि कारओके स्टूडीओ या संकल्पनांवर काम करायला सुरुवात केली. शाळेतील शिक्षकांची भक्कम साथ आणि ग्रामस्थांची सोबत यातून दुष्काळी गाव असताना सुद्धा लोकांनी पोटाला चिमटा घेऊन शिक्षकांना साथ द्यायची म्हणून लोकवर्गणी द्यायला सुरुवात केली. फक्त गावातीलच नव्हे तर गावातून स्थलांतर होऊन इतर ठिकाणी असलेल्या लोकांनी शाळेला मदत करायला सुरुवात केली. फेसबुकवरील काही मित्रमैत्रीणीनी सुद्धा या कामात आम्हाला मदत केली आणि उभा राहिला आमचा स्टूडीओ. रानातली रानपाखर गोड गळ्याने गायला लागली. स्वत:चे गाणे म्युझिक सिस्टीम वर ऐकायला लागली. आपल्या पोराचा आवाज ऐकून मायामाउल्या आणि शेतात काम करणारी मजुरी करणारी मंडळी हा माझ्याच पोराचा/पोरीचा आवाज आहे काय? याची खात्री करून घ्यायला लागली. हातात काटक्या घेऊन दिसेल त्या वस्तूवर मारून नाद निर्माण करणारी चिमुकली बोटे कॅसिओ वर फिरायला लागली त्यातून निर्माण होणार्या ध्वनित गुंग व्हायला लागली. ढोल,ढोलकी, ड्रम, खंजिरी, यातून ठेका निर्माण करायला लागली. लाईट, कॅमेरा , अक्शन हे शब्द ऐकताच कॅमेर्यासमोर उभे राहून पुस्तकातील पाठाचे नाट्यीकरण करायला लागली, त्यांचे रेकॉर्ड केलेले पाठ प्रोजेक्टरवर पाहत माझा कोणत्या शब्दाचा उच्चार चुकला ते स्वत:हून शोधायला लागली. “शिकायचं म्हणजे लय मज्जा असती” ही याच चिमुकल्यांनी केलेली आमच्या शाळेतील शिक्षणाची व्याख्या. आमच्या शाळेच्या या प्रयोगाची चर्चा राज्यभर मिडिया, सोशल मिडिया किंवा इतर माध्यमांच्या सहाय्याने पोचली. शिक्षणाच्या वारी सारख्या कार्यक्रमात आमच्या या प्रयोगाचे राज्यभरातील शिक्षकांसमोर सादरीकरण झाले. अगदी Transform महाराष्ट्र या कार्यक्रमात सुद्धा शाळेचा हा प्रयोग मांडला गेला होता. सगळ मुलांच्या शिकण्यातील बदल आताशी कुठे जाणवू लागले होते. मागील महिन्यात शिक्षण विकास मंच या राज्यातील उपक्रमशील शिक्षक, अधिकारी आणि शिक्षणशास्त्राचे अभ्यासक असणाऱ्या गटात कलेसारख्या विषयांत जिल्हा परिषदेतील शाळांतील शिक्षक काय करतात अशी चर्चा रंगली होती.त्यावेळी मी माझ्या शाळेत आम्ही करीत असलेल्या प्रयोगांची माहिती दिली होती. त्याबद्दलची पोस्त वाचून मुंबईतील निवृत्त मुख्याध्यापिका आणि समुपदेशक असलेल्या श्रीमती शैलजा मुळ्ये यांनी मला फोन केला सुमारे पंधरा मिनिटे माझ्याशी चर्चा केली. गरीब, मागास आणि कष्टकरी समाजातील  मुले इतक्या उत्तम रीतीने शिकत आहेत त्यांच्यासाठी एका जिल्हा परिषद शाळेत इतक्या काही सुविधा आम्ही उभारल्या आहेत हे ऐकून त्यांना खूप नवल वाटले. आणि त्यांनी थेट तुम्हाला सध्या काय आवश्यक आहे असे विचारले. मुलांना संगीत शिकण्यासाठी ऑक्टापड घ्यायचे हे माझे सहा वर्षापासुनचे स्वप्न होते. मी त्यांना ते बोलून दाखवले. त्यांनी क्षणाचीही उसंत न लावता मी यासाठी मदत करेल असे सांगितले. तुम्ही मुंबईला कधी येताय ? असे विचारले योगायोगाने तीनच दिवसानंतर ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमासाठी आमच्या शाळेला बोलावणे आले होते. मी एका विद्यार्थ्यासोबत मुंबईला जाणार होतो. माझ्या घरी आवर्जून या असा आग्रह श्रीमती शैलजा मुळ्ये यांनी केला आणि तीस हजार रुपये आमचे हे स्वप्न साकार करण्यासाठी दिले. प्रचंड आनंदात आम्ही शाळा उघडायची वाट पाहू लागलो कारण आमचे सहा वर्षांपासूनचे स्वप्न साकार होणार होते. शाळा सुरु झाली आणि ऑक्टापड पाहून मुले प्रचंड आनंदित झाली. उमेश, कृष्णा, लखन, अपेक्षा, वैष्णवी अशा आमच्या एकेक चिमुकल्यांचे हात त्यावर सराईतपणे चालू लागले. शाळेत न येणारी मुले या स्टूडीओच्या ओढीने शाळेत यायला लागली. लखन हा सहावीतील मातंग समाजातील मुलगा, वडिलांसोबत डफड वाजवायला जाणारा त्याच्या हातात मी स्टिक्स दिल्या आणि त्याने ऑक्टापड मधून काढलेल्या पहिल्या बोलातच त्याच्यातील प्रतिभेची जाणीव मला झाली. आठ दिवसांत लखन इतके सुंदर वाजवायला शिकला की तो वाजवताना मी त्याच्याकडे पाहतच बसायचो. या लेकराला कोणाची नजर लागू नये अशी काळजी मला वाटायची. आम्ही आता आणखी मोठी स्वप्ने पहायला लागलो. शालेय स्पर्धांत भाग घ्यायचा आणि मग काय बक्षीस आपलेच........!!!
                स्वप्न फक्त स्वप्नच राहिलं तर ते तुटण्याचं फारसं दु:ख वाटत नाही, परंतु आमचं स्वप्न आता सत्यात उतरायला लागलं होतं. अभासाकडून वास्तवाकडे त्याचा प्रवास सुरु झाला होता, आमचे ध्येय समोर दिसत होते. परंतु अचानक एखादी काच निखळून पडावी आणि त्याच्या काचा छिन्नविछिन्न होऊन भंग पावाव्यात तसे आमच्या स्वप्नाच्या चिंध्या झाल्या.
             सकाळीच एका पालकाचा फोन आला, “हल्लो सर, लवकर या आपल्या शाळेत चोरी झालीय. दरवाजा तोडलाय आपल्या म्युझिक स्टुडीओतील बरचसं सामान नेलंय ”  हे वाक्य कानात तप्त शीस ओतावं असं वाटलं. मी माझा विश्वासच बसेना. तिकडून फोनवर कृष्णा रडवेला होऊन बोलत होता. “सर, प्लीज लवकर शाळेत या”. धावतपळत शाळेत गेलो समोरील दृश्य सुन्न करणार होत. संगणक कक्षाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी म्युझिक रूम मधील बरेच समान लांबविले होते. आताच आलेला ऑक्टापड सुद्धा गेलेला. आमचा स्टुडीओ संपूर्ण उध्वस्त झालेला आणि त्याबरोबर उध्वस्त झालेलं माझं स्वप्न.......
                  या स्टुडीओमधील एकेक वस्तू जमवताना घेतलेले परिश्रम, प्रत्येक वस्तु मिळविण्यासाठी केलेली खटाटोप आणि शेवटी या वस्तू लोकसहभागातून मिळविल्यानंतर मुलांच्या शिकण्यातील आनंद. शाळेत येण्यास टाळाटाळ करणारी मुले आता शाळेत सर्वात अगोदर यायला लागली होती, नवनवीन गोष्टी शिकायला लागली होती आणि त्यातच चोरट्यांनी त्यांच्या पोटासाठी आमचे सर्वस्व लुटून नेले होते. खिन्न मनाने डोळ्यात पाणी आणून मुले बसली होती. आमच्या कडे पाहून त्यांना आम्हाला काय विचारावे हे सुद्धा समजत नव्हते. काही मुले प्रचंड चीड व्यक्त करत चोरट्यांचे वाटोळे होईल अशा शिव्याशाप देत होते. जो स्टुडीओ आमच्या शाळेची ओळख बनला होता तो आता राहिला नाही ही कल्पनाच करवत नाही. हा स्टुडीओ आता कसा उभा करावा या प्रश्नासोबत लखन दररोज विचारतोय “सर आता कुठून आणायचा स्टुडीओ? आता कोण करणार आपल्याला मदत ?” उमेश दररोज विचारतोय “ सर सापडले का चोर?” वैभवी विचारतेय “आता गाणी कशी रेकॉर्ड करायची?” आणि त्यांच्या प्रश्नांना “करू रे बाळांनो पुन्हा सगळ उभं” असं उत्तर देत मी वास्तवापासून पळ काढतोय. “कधी करणार हे उभं ?” या प्रश्नाला मात्र माझ्याकडे उत्तर नाहीये.
          गर्भात जोमाने वाढत असलेलं स्वप्न खुडून गेलं  अन या स्वप्नाचा गर्भपात झाला एवढंच वास्तव आता उरलंय. पाहूयात मोडलेलं स्वप्न पुन्हा उभं करता येतंय का?
                   
                                          सोमनाथ वाळके
                                     ७५८८५३५७७७
                 जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारगाव जोगेश्वरी
                                  ता- आष्टी, जि-बीड

                      somnathwalke007@gmail.com

2 comments:


  1. Awesome Blog
    The useful information about sarkari results in the blog look forward to your next article.
    thanks for you article
    Now i am following your blog information .

    ReplyDelete